दीड हजाराची लाच घेताना महिला तलाठी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सिल्लोड (औरंगाबाद ) :  पोलीसनामा ऑनलाइन-जमिनीची नोंद फेरफार रजिस्टरमध्ये घेण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेतांना सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद येथील महिला तलाठीस लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी कार्यालयात करण्यात आली. दिपाली तुकाराम जाधव (30 ) असे आरोपी तलाठीचे नाव असून या कारवाईने तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावावर रहीमाबाद शिवारात जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तक्रारदारांनी तलाठ्यांकडे दिले होते. परंतु हे फेर घेण्यासाठी तलाठी महिलेने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. तड़जोड़ी अंती दीड हजार रूपये देण्याचे ठरले होते. परंतु तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथे या प्रकरणी तक्रार दिली. यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी टिळक नगर येथील तलाठ्यांच्या खाजगी कार्यालयात सापळा रचला. याच ठिकाणी आज दुपारी जाधव यांना लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी,अप्पर पोलिस अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नितिन देशमुख,पोलिस निरीक्षक महादेव ढाकने,पोलिस नाईक भीमराज जीवड़े, अश्वलिंग होनराव, बाळासाहेब राठोड, महिला पोलिस शिपाई नुसरत शेख, संदिप चिंचोले यांनी केली.