उपोषणाला राहुल गांधी तीन तास ‘लेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे देशभरात आज दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात उपोषण आणि आंदोलन सुरू आहे. या उपोषणाचे गांभीर्य पहिल्या दिवसापासूनच दिसत आहे. दलितांचा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे स्वतःच तीन तास उशीरा पोहोचले. यामुळे अर्थातच विरोधकांच्या हाती यामुळे आयते कोलीत मिळाले आहे.

भाजपकडून राहुल गांधीच्या उशीरा येण्यावर उपहासात्मक टीका करण्यात आली आहे. राजघाटावर उपोषण होणार असल्याने दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्यासह अनेक काँग्रेस नेते सकाळपासून हजर होते. मात्र, राहुल गांधी वेळेत पोहोचले नाहीत. उपोषणासाठी सकाळी दहापासून संध्याकाळी चारपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी एक वाजता उपोषणस्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधींच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन उपोषण सुरू केले.

राहुल गांधींच्या उपोषणावर भाजपने उपहासात्मक टीका केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ”राहुलजी तुमचे जेवण झाले असेल तर उपोषणाला बसा आता. राहुल गांधी उशीरा उपोषण स्थळी आलेत कारण त्यांची उशीरा झोपून उशीरा उठण्याची स्टाईल आहे.”