आयकर विभागाचे शहरात छापासत्र एकाचवेळी ७ ठिकाणी छापे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर शहरातील व्यापारी, बिल्डर व उद्योजकांच्या  घर व कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आज दुपारी एकाच वेळी तब्बल सात ठिकाणी छापे पडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

संबंधित व्यापारी व उद्योजकांच्या घरातील विविध कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्यात प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांचाही समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयकर विभागाचे पुणे, नगर येथील कार्यालयाने वेगवेगळी पथके तयार करून सात ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यांचे दैनंदिन व्यवहार, बँक स्टेटमेंट, मालमत्ता विषय कागदपत्रे आदींची तपासणी केली जात आहे.

याबाबत आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘ही नियमित कारवाई आहे. कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. अद्यापपर्यंत काही आक्षेपार्ह आढळले नाही. तपासणी सुरू असल्याने सध्या काहीही सांगता येणार नाही. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक वाटल्यास तपशील जाहीर करू.’