मित्राने डोक्यात बॅटने मारल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीत क्रिकेट खेळताना झालेल्या वादात मित्राने डोक्यात बॅटने प्रहार केल्याने एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण शहरात शनिवारी (दि. 9) सायंकाळी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अवघ्या 13 वर्षांचा मुलगा गमावल्याने कुटुंबाने मोठा आक्रोश केला. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. लहान मुलांकडे पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज या संपूर्ण प्रकारामुळे अधोरेखित झाली आहे.

मंगेश दळवी (वय 13) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पेण शहरातील कुंभारआळी सद्गुरू पार्क येथे सोसायटीमधील मुलांचा असाच एक क्रिकेटचा डाव रंगला होता. यावेळी दोन मुलांमध्ये किरकोळ वाद झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. अशातच रागाच्या भरात एका मुलाने दुसऱ्याच्या डोक्यावर बॅटने जोरदार प्रहार केला. यामध्ये मंगेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पेण सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रेम दळवी याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी आणला असता परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलीसांकडून हॉस्पिटलबाहेर बंदोबस्त ठेवला होता.