रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक बातमी! ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी वाचा ही मार्गदर्शक तत्व, अन्यथा पडेल महागात

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा आता हळुहळु सुरळीत होत आहे. ट्रेन सेवा सुरू झाल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. तर ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत भारतीय रेल्वेने लोकांना आवश्यक मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून एक ट्विट करून कोरोनाच्या गाईडलाइन फॉलो करण्यास सांगण्यात आले आहे.

जाणून घ्या काय म्हटले रेल्वेने?
रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, कोविड-19 ची महामारी पहाता, प्रवाशांना विनंती आहे की, त्यांना प्रवास करण्यापूर्वी विविध राज्यांनी जारी केलेल्या आरोग्यासंबंधी मार्गदर्शक तत्वांचे वाचन करावे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची प्रकरणे देशातील अनेक राज्यांमध्ये वाढल्यानंतर अनेक राज्यांनी दुसर्‍यांदा कठोर धोरण अवलंबले आहे. नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. अशावेळी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी जास्त सतर्कता बाळगत आहे. नुकतेच दिल्ली-मुंबईहून बिहारला जाणार्‍या प्रवाशांसाठी पूर्व मध्य रेल्वेने विशेष अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, जे प्रवासी होळीसाठी मुंबई किंवा इतर राज्यांतून बिहारमध्ये येत आहेत, त्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल तसेच सर्व प्रवाशांनी मास्क घालणे अनिवार्य आहे.

प्रवासापूर्वी जाणून घ्या या गोष्टी
ट्विटमध्ये हे स्पष्ट सांगण्यात आले आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवाशी ज्या राज्यात जात आहेत त्या राज्याची मार्गदर्शक तत्व जाणून घ्यावीत. सध्या प्रत्येक राज्यात राज्य सरकारांनी विविध गाईडलाईन जारी केल्या आहेत. काही राज्यांमध्ये प्रवेशासाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि कोरोनाला तोंड देण्यासाठी हे करण्यात आले आहे.