राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरांची किंमत अखेर ठरली !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर (Raj Kapoor) आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरं खरेदी करण्याचा निर्णय पाकच्या खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांताच्या सरकारनं घेतला आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या या घरांच्या इमारती मोडकळीस आल्या असून अतिशय जीर्ण झाल्या आहेत. त्या ध्वस्त होण्याआधीच त्या खरेदी करण्याचा आणि त्यांचं संवर्धन करण्याचा निर्णय खैबर पख्तूनख्वा सरकारनं घेतला आहे. या दोन्ही इमारती पेशावर (Peshawar) च्या मध्यवर्ती ठिकाणी असून त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे. खरेदीसाठी आता घरांची किंमतही निश्चित करण्यात आली आहे.

एका वृत्तानुसार, दिलीप कुमार यांच्या 4 मजली घराची किंमत 80.56 लाख रुपये तर राज कपूर यांच्या घरासाठी 1.5 कोटी रुपये एवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. कम्युनिकेशन आणि वर्क्स डिपार्टमेंटच्या अहवालानंतर पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असगर यांनी दोन्ही घरांचं मूल्य ठरवलं आहे.

फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या याच घरांमध्ये राज कपूर आणि दिलीप कुमार या दिग्गज अभिनेत्यांचा जन्म झाला होता. पेशावरच्या किस्सा खवानी बाजारात राज कपूर यांचं हे वडिलोपार्जित घर आहे. त्यांचे आजोबा बासेश्वरनाथ कपूर यांनी हे घर उभारलं होतं. याच घरात राज कपूर यांचं बालपणही गेलं आहे.

दिलीप कुमार यांचीही 100 वर्षे जुनी वास्तू याच परिसरात आहे. दिलीप कुमार यांनीही याच घरात जन्म घेतला. नवाज शरीफ यांच्या सरकारनं 2014 मध्ये हे घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलं होतं.

महत्त्वाची बाब अशी आहे की पेशावरमध्ये अशा स्वरूपाच्या तब्बल 1800 इमारती आहेत. त्यापैकी अनेक इमारती या तब्बल 300 वर्षे एवढ्या जुन्या आहेत.