अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरे यांना पत्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुचवला ‘हा’ उपाय

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोनावर उपाय सुचवला आहे. याशिवाय अमित ठाकरे यांनी डॉक्टरांना चार हजार हायप्रोटिन्सयुक्त खाद्यपदार्थाच्या पॅकेट्सची मदत केली आहे. यापूर्वी अमित ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांना पीपीई किट्स, मास्क आणि बेडशिट्स वाटप केले आहे.

राज्यात कोरोना व अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत. त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरीकांना माहित नाही. त्यामुळे काही नागरिकांना ऐन आजारात एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. तरी रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी अमित ठाकरे यांनी काका आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उपाय सुचविला आहे.

अमित ठाकरे यांनी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात येत असणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी करण्यासाठी एक खास अ‍ॅप तयार करण्याची मागणी केली आहे. अ‍ॅपद्वारे लोकांना रुग्णालयात जागा उपलब्ध आहेत की नाही याची माहिती मिळावी. रुग्णसंख्या किती झाली याची माहिती मिळावी, असंही अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, मसेचं नेतपद स्विकारल्यानंतर अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.