भाजपाच्या ‘या’ नेत्याचा पक्षाला रामराम, उचलला ‘धनुष्य-बाण’

जयपूर : वृत्तसंस्था – निवडणुकीआधी अनेक चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. यातलाच एक प्रकार म्हणजे पक्षांतर. निवडणुकीआधी उमेदवारांकडून होणारं पक्षांतर आपल्यासाठी काही नवं नाही. भाजपाच्या नेत्यानं विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपल्याला तिकीट मिळणार नाही, अशी शक्यता दिसताच नेते मंडळी नवा मार्ग शोधू लागतात. राजस्थानातही असंच घडलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पक्षाला सोडचिठ्ठी देणारा हा नेता शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे समोर आले आहे.  राजस्थानात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

अलवर (शहर) विधानसभा मतदारसंघातून आपल्याला भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा अलवर जिल्ह्यातील भाजपाचे नेते श्रीकृष्ण गुप्ता यांना होती. मात्र गेल्या आठवड्यात भाजपाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं.  भाजपानं या मतदारसंघातून संजय शर्मा यांना तिकीट दिलं. सध्या बनवारीलाल या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. तेदेखील भाजपाचे नेते आहेत. मात्र पक्षानं त्यांचाही पत्ता कापला. नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवून सरकारविरोधातील नाराजी टाळण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. अलवर जिल्ह्यातील भाजपाचे नेते श्रीकृष्ण गुप्ता यांनी काल उमेदवारी अर्ज भरला.

‘ब्राह्मण समाजाचे मतदार कमी असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र वैश्य समाजाचे मतदार जास्त असतानाही त्यांना तिकीट वाटपात जाणीवपूर्वक डावलण्यात आलं,’ असा आरोप गुप्ता यांनी केला. तिकीट वाटप करताना पक्षानं स्वत:चा आणि एजन्सीचा सर्व्हेदेखील विचारात घेतला नाही. त्यामुळे आपण पक्षाला रामराम करत असल्याचं गुप्ता यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं. एवढंच नाही तर तिकीट वाटप करताना भाजपानं वैश्य समाजाकडे दुर्लक्ष केल्याची भावना गुप्ता यांनी पक्ष सोडताना बोलून दाखवली.