रशियाच्या Sputnik V लशीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ठाकरे सरकार विविध उपाययोजना करत आहे. जास्तीत लोकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीसंदर्भात शुक्रवारी (दि. 7) महत्वाची माहिती दिली. राज्यात स्पुटनिक-व्ही लसीचा साठा आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी संबंधित कंपनीशी चर्चा केली जात असल्याचे टोपे म्हणाले. त्यामळे आगामी काळात राज्यातील जनतेला स्पुटनिक-व्ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. टोपे यांनी यावेळी Sputnik V लसीचा दर ठरविण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडसोबत चर्चा करुन Sputnik V उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न केला जात आहे. देशात सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. पण अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांवर लशीचा तुटवडा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्याच्या पाठपुरावा सुरु असल्याचे ते म्हणाले. दरम्यान राज्यात सध्या 18 ते 44 वयोगटातील एकूण 15 हजार 274 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. राज्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 28 लाख 66 हजार इतकी असल्याचे टोेपे म्हणाले.