राजीव सातव काँग्रेसचे धुरंधर राजकारणी ! जाणून घ्या पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार बनलेल्या सातव यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे तरुण नेतृत्व असलेले खासदार ॲड. राजीव सातव यांचे वयाच्या 45 व्या वर्षी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. राजीव सातव हे देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जात होते. सातव यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद होतं. तसेच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.

राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाट असताना देखील विजय मिळवला होता. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता.

राजीव सातव यांचा राजकीय प्रवास

1. राजीव सातव यांना आई माजी मंत्री रजनी सातव यांच्याकडून बालपणापासून राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यामुळे तरुणपणीच राजकारणात पदार्पण केलेल्या राजीव सातव यांची राजकीय वर्तुळात दमदार ओळख निर्माण झाली.

2. 2002 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीच्या मसोड गणाचे ते सदस्य झाले होते. 2007 मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्य व कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती पद त्यांनी भूषवले.

3. 2009 मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. याच कालावधीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
4. काँग्रेस पक्षातील अत्यंत महत्वाचे समजले जाणारे राजीव सातव हे पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले. एवढेच नाही तर दुसऱ्या प्रयत्नात थेट खासदार झाले.

5. देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट असताना त्या लाटेत देखील सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून विजय प्राप्त केला होता.

6. राज्याच्या राजकारणात काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणूनही राजीव सातव यांची ओळख निर्माण झाली होती.

7. काँग्रेस पक्षाच्या नव्या पिढीतील नेत्यांमधील एक धुरंधर आणि तरबेज राजकारणी म्हणून राज्यातच नाही, तर देशात त्यांची ओळख निर्माण झाली होती. राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील हुकमी एक्का म्हणून त्यांची ओळख होती.

8.राजीव सातव यांची संसदेतील भाषणं ही अभ्यासपूर्ण होती. लक्षवेधी मांडणी करण्याचे कसब त्यांच्याकडे असल्याने सातव यांना सलग तिसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

9. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. यामध्ये प्रामुख्याने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद, गुजरात विधानसभेच्या निवडणुकांमधील प्रचार, पंजाब राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवून देणे, या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सहजपणे पार पाडल्या होत्या.