अभिनेता राजकुमार रावच्या वडीलांचे 60 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचे वडील सत्यपाल यादव यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. 5 सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनूसार, सत्यपाल यादव यांचे अंतिम संस्कार गुरुग्राममधील मदन पुरी स्मशानभूमीत केले गेले. सत्यपाल हे गेल्या 17 दिवसांपासून मेदांता रुग्णालयात दाखल होते. आज सकाळी दहा वाजता त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंब व जवळचे मित्र उपस्थित होते.

सत्यपाल यादव हे सरकारी कर्मचारी होते आणि ते महसूल विभागात काम करत होते. राजकुमार राव यांच्या आईचेही 2017 मध्ये निधन झाले. त्यावेळी राजकुमार ‘न्यूटन’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. आईच्या निधनानंतर दुसर्‍याच दिवशी तो शूटिंगला परतला. राजकुमार त्यावेळी म्हणाला, ”मी एकाच दिवसात शूटसाठी परत आलो कारण मला माहित आहे की, माझी आई माझ्या या अॅटिट्यूडला पसंत करत होती. मी नेहमीच माझे काम आणि माझ्या वचनबद्धतेबद्दल प्रामाणिक रहावे आणि माझ्या कर्तव्यापासून कधीही मागे हटू नये, अशी तिची नेहमीच इच्छा होती. ”

राजकुमार पुढे म्हणाला की, जेव्हा ती मला रुपेरी पडद्यावर बघायची तेव्हा तिच्या आयुष्यातील सर्वात आनंददायक क्षण असायचा. जेव्हा ती माझ्यासोबत नव्हती तेव्हा तो टप्पा माझ्यासाठी खूप कठीण होता, परंतु मला नेहमीच सेट्सवर असे वाटत होते की ती माझ्यासोबत आहे आणि माझे धैर्य वाढवत आहेत.