स्वाभिमानी आणि मनसे विधानसभेत एकत्र येणार काय ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि पक्षांना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून महाआघाडीच्या नेत्यांपुढे पुन्हा एकदा आपल्या पक्षाला बळकटी देण्याचे आव्हान आहे.

विविध राजकीय पक्ष आणि संघटना या पराभवानंतर विविध पर्यायांची चाचपणी करत आहेत. त्याच पार्शवभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दादर येथील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्याविरोधात पराभव स्वीकारावा लागला आहे.

या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपले उमेदवार न देता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठवले होते. राज्यभरात १० मोठ्या सभा घेऊन त्यांनी महायुतीला मतदान न करण्याचे मतदारांना आवाहन केले होते. मात्र या प्रचाराचा त्यांना मतदानात फायदा झालेला दिसून आला नाही. त्यामुळे या विधानसभेला राज ठाकरे सावध भूमिका घेत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाआघाडीमध्ये देखील त्यांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर राजू शेट्टी यांनी देखील विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठवले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी सांगताना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे दोघे एकत्र एकूण निवडणूक लढवतात कि ही भेट फक्त भेटच ठरते ही आगामी काळात स्पष्ट होईलच.