‘लवकरच विरोधी पक्ष देखील माझे स्वागत करेल’, राज्यसभेत ‘शेम-शेम’च्या घोषणेवर खा. रंजन गोगोईंनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. अलीकडेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खासदार म्हणून त्यांची निवड केली होती. गोगोई यांनी गुरुवारी शपथ घेतली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कायदामंत्री रविशंकर प्रसाद आणि इतर मंत्री व खासदार सभागृहात उपस्थित होते. मात्र, गोगोई यांच्या शपथविधी दरम्यान विरोधकांनी ‘डील’ असे नारे देत, आरडाओरडा केला आणि ते सभागृहाबाहेर पडले. खा. गोगोई यांना जेव्हा विरोधकांच्या या वृत्तीवर प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले की मला यावर भाष्य करण्याची इच्छा नाही ते लवकरच माझे स्वागत करतील.

राज्यसभेत उपस्थित कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सभागृहात गदारोळ घातल्याबद्दल विरोधी पक्षावर टीका केली. ते म्हणाले की याआधीही अनेक न्यायाधीशांनी राज्यसभेची शोभा वाढवली आहे, परंतु अशा प्रकारे विरोध करणे लज्जास्पद आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘राज्यसभेत माजी सरन्यायाधीशांसह विविध क्षेत्रांतून आलेल्या अनेक नामांकित व्यक्तींची उत्तम परंपरा आहे. आज शपथ घेतलेले खा.गोगोई नक्कीच सर्वोत्कृष्ट कार्याचे योगदान देतील. शपथविधी सोहळ्यादरम्यान प्रसाद म्हणाले, “विरोधकांनी असे करणे अनुचित होते”.

गोगोई हे 46 वे सरन्यायाधीश
रंजन गोगोई हे देशाचे 46 वे सरन्यायाधीश राहिले आहेत. 3 ऑक्टोबर 2018 ते 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत त्यांनी सरन्यायाधीशपद सांभाळले. 18 नोव्हेंबर 1954 रोजी आसाममध्ये जन्मलेल्या रंजन गोगोई यांनी दिब्रूगडमधील डॉन बॉस्को स्कूल आणि दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. 28 फेब्रुवारी 2001 रोजी रंजन गोगोई यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती गोगोई 23 एप्रिल 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि त्यानंतर 46 वे सरन्यायाधीश झाले. 17 नोव्हेंबर 2019 रोजी ते निवृत्त झाले.

अयोध्या प्रकरणाव्यतिरिक्त रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आसाम एनआरसी, राफेल, सरन्यायाधीश कार्यालय आणि आरटीआय अंतर्गत अनेक ऐतिहासिक निर्णय दिले.

कार्यकाळही वादग्रस्त :
गोगोई आपल्या 13 महिन्यांच्या कार्यकाळात अनेक वादात अडकले होते. त्यांना लैंगिक छळाच्या गंभीर आरोपाचादेखील सामना करावा लागला. परंतु त्यांनी आपल्या कामावर त्याचा कधीही परिणाम होऊ दिला नाही. नंतर त्यांना आरोपांमधून मुक्तही करण्यात आले. रोस्टर वादाबाबत ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या 4 न्यायाधीशांमध्ये गोगोई हेदेखील होते.