राम मंदिरासाठी जमा झाला 2.5 हजार कोटीची निधी, आता घरोघरी जाऊन निधी संकलन झाले बंद

पोलीसनामा ऑनलाईनः   अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून निधी जमा केला जात होता. आतापर्यंत जमा झालेली वर्गणी ही तब्बल अडीच हजार कोटी रुपये झाल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. मंदिर उभारणीसाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली जात होती. पण त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याची मोहीम बंद केल्याचे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

याबाबत राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. राय म्हणाले की,  राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद  केली आहे. लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने द्यावी. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू झाली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. येत्या 3 वर्षात राममंदिराची उभारणी पूर्ण होईल असे ते म्हणाले.