सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 5 जणांना सक्तमजुरीची शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – आत्याच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अजिंक्य काळे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर यांनी १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. तर त्याला सहाय्य करणाऱ्या अन्य चौघांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

ही घटना ७ एप्रिल २०१६ रोजी बेडग येथे घडली होती. यातील आरोपी दत्तात्रय क्षीरसागर हे मुलीचे वडील आणि मारुती क्षीरसागर हे काका आहेत. अजिंक्य हा पीडित मुलीच्या आत्याचा मुलगा आहे. सौ. रेखा काळे ही आत्या तर एकनाथ काळे तिच्या आत्याचा नवरा आहे. यातील पीडित मुलीच्या आत्याने मुलीच्या वडिलांना शेती घेण्यासाठी १ लाख रुपये उसने दिले होते. काही कारणास्तव पिडीतेचे वडील पैसे परत करू शकले नाहीत. मुलीच्या आत्याने पैसे दे अन्यथा तुझ्या मुलीचे माझ्या मुलाशी लग्न लावून दे म्हणून तगादा लावला होता. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांना त्यांचा भाऊ मारुती याच्याशी संगनमत करून मुलीला शिक्षणासाठी बेळगाव येथे घेऊन जाण्याचे खोटे सांगून तिची आत्या राहत असलेल्या ठिकाणी तासगाव तालुक्यातील जरंडीपात्रा येथे आणले.

तेथे पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिला ठार मारण्याची धमकी देऊन ती अल्पवयीन आहे हे माहित असतानाही अजिंक्यशी विवाह करून दिला. त्यानंतर अजिंक्य याने तिला मी तुझा कायदेशीर नवरा आहे असे म्हणत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. रेखा व आत्माराम हे दोघेजण तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होते. सदरच्या त्रासाला कंटाळून त्या मुलीने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीच्या आधारे सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सौ. रेखा काळे, एकनाथ काळे, दत्तात्रय क्षीरसागर, मारुती क्षीरसागर यांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार दोषी धरून २ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. अजिंक्य, रेखा आणि एकनाथ यांना कलम ३४२ नुसार ६ महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड आणि दंड न दिल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पीडित मुलगी, घटनास्थळाचे पंच, वैद्यकिय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी, पुराव्यानुसार सर्व आरोपींना शिक्षा सुनावन्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त