Pune News : रेशनकार्डला आधार लिंक न केल्यास 1 फेब्रुवारीपासून रेशन बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिका धारकांना आपला मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक लिंक करण्यास शासनाकडून सांगण्यात आले आहे. शिधापत्रिका धारकांनी 31 जानेवारी पर्यंत केवायसी न केल्यास त्यांना 1 फेब्रुवारी पासून धान्य मिळणार नसल्याची माहिती पुण्याचे अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 12 लाख 32 हजार 871 लाभार्थी असून त्यापैकी 10 लाख 61 हजार 822 इतक्या लाभार्थ्यांनी आधार सिडींग केले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी विशेष मोहिम राबवून लाभार्थ्याचे आधार, मोबाईल शिधापत्रिकेशी लिंक केले जात आहेत. यासाठी रास्तभाव दुकानातील दुकानातील ई-पॉस उपकरणाद्वारे eKYC व मोबाईल सिडींग चे प्रमाण वाढवण्यात येत आहे. यासाठी 31 जानेवारी 2021 पर्यंत संपूर्ण सिडिग होण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 11 परिमंडळ कार्यालयात मोहीम राबण्यात येत आहे. त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करते वेळी ई-पॉस उपकरणाद्वारे रास्तभाव दुकानदारामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना आधार व मोबाइल क्रमांकाचे सिडींग करता येणार आहे. ज्या शिधापत्रिका धारकांचे सिडींग झालेले नाही त्यांची दुकाननिहाय यादी तयार करण्यात आली असून 11 परिमंडळ कार्यालयांना मोबाइल आणि आधार सिडींग करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शिधापत्रिकेत नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड संबंधित रास्तभाव दुकानातून eKYC पडताळणी पूर्ण करु घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. eKYC करताना कुटुंबातील एका व्यक्तीचा चालू फोन नंबर देणे आवश्यक आहे. 31 जानेवारी पर्यंत eKYC केली नाही तर 1 फेब्रुवारी 2021 पासून लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केला जाणार नाही.