रावेर लोकसभा मतदारसंघ ; भाजपच्या रक्षा खडसे विजयाच्या दिशेने ; काँग्रेसचे उल्हास पाटील चौथ्यांदा पराभवाच्या वाटेवर 

रावेर : पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल मानल्या जाणाऱ्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांची विजयाची दिशेने वाटचाल सुरु आहे. आघाडीचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास  पाटील हे पराभवाच्या छायेत  आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, रक्षा खडसे यांना ५९.९२% मिळाली आहेत तर उल्हास पाटील यांना २९.२६ % मिळाली आहेत. रक्षा खडसे या उल्हास पाटील यांच्यापेक्षा तब्ब्ल  ३ लाख ६१ हजार ६९० मतांनी पुढे आहेत, त्यामुळे रक्षा खडसे यांचा विजय निश्चित झाला आहे.

या मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि काँग्रेसचे उमेदवार  डॉ. उल्हास पाटील यांच्यात थेट लढत झाली. भाजप नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे येथून लढत असल्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य ठरविण्यासाठी  ही निवडणूक महत्वाची होती.

रावेर मतदारसंघातून १२ उमेवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. बसपा कडून योगेंद्र कोलते तर  वंचित बहुजन आघाडी तर्फे  नितीन कालेकर या मतदारसंघातून उभे आहेत. योगेंद्र कोलते यांना ०.५२ %  इतकी मते मिळाली तर नितीन कालेकर यांना ८.०९ %  इतकी मते मिळाली आहेत.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासाठी ही निवडणूक ‘करो या मारो’ अशीच होती. १९९८ साली झालेल्या निवडणुकीत डॉ. उल्हास पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु त्यावेळी अवघ्या १३ महिन्यात सरकार कोसळून लोकसभा बरखास्त झाली होती. उल्हास पाटील फक्त १३ महिन्यांचे खासदार ठरले. या नंतर उल्हास पाटील यांनी लढवलेल्या पुढील तिन्ही निवडणुकीत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता उल्हास पाटील यांना चौथ्यांदा पराभवास सामोरे जावे लागत आहे.

२०१४ ला  मोदी लाटेत भाजपाच्या रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांचा तीन लाखाहूनही जास्त मतांनी पराभव केला होता. २००९ मध्ये रावेर हा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी पहिली निवडणूक भाजपाचे हरिभाऊ जावळे यांनी जिंकली होती. त्यांनी राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जावळे आमदार म्हणून निवडून आले. हा मतदारसंघ भाजपासाठी अत्यंत अनुकूल मानला जात असल्यामुळे भाजपसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. रावेर  लोकसभा मतदारसंघातील  सहाही आमदार भाजपा-शिवसेना युतीचे आहेत.