दिलासादायक ! लाभांश वाटपाच्या निर्बंधातून सहकारी बँका मुक्त

मुंबई : रिझर्व्ह बँकेने लाभांश वितरणासंदर्भात गुरुवारी एक अध्यादेश जारी केला आहे. या नव्या निर्णयानुसार सहकार क्षेत्रातील बँकांना लाभांश वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो सभासदांना दिलासा मिळाला असून बँकाकडून आता लवकरच लाभांश जाहीर केले जातील आणि त्याचे वितरण केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, लाभांश वाटपाच्या या नव्या आदेशामुळे सहकारी बँकां निर्बंधातून मुक्त झाल्या असल्या तरी वाणिज्य बँकांवर निर्बंध कायम आहेत.

कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यातून सावरत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. अशा या परिस्थिती बँकांनी स्वनिधी आणि भांडवलाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे, आकस्मित तोटा झाल्यास तो सहन करण्याइतपत भांडवल प्रमाण राखून ठेवावे असा सल्ला रिझर्व्ह बँकेने बँकांना दिला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात नफा झाला असल्यास त्यात केवळ ५० टक्क्यांपर्यंत लाभांश सभासदांना वितरीत करावा, असे निर्देशही रिझर्व्ह बँकेने शेड्युल कमर्शिअल बँकांना (वाणिज्य) दिले आहे. त्याचबरोबर लाभांश वितरणाबाबत सहकारी बँकांना कोणतेही बंधन नाही, असेहि स्पष्ट केले आहे.

सध्याची बँकेची आर्थिक स्थिती, भविष्यातील भांडवलाचा आढावा बँकेच्या संचालक मंडळाने घ्यावा तसेच, भविष्यात लागणारे भांडवल, तोटा झाल्यास करावी लागणारी तरतूद , सध्याची आर्थिक स्थिती आणि त्याचा नफ्यावर होणारा परिणाम या घटकांचा विचार समभागावर लाभांश ठरवताना करावा असेही रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे.