Pune News : जिल्ह्यात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी ! मुदत संपलेल्या आणि स्थापित ग्रामपंयातीचे आरक्षण जाहीर

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल वर्षभर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, ज्यांची मुदत त्यांच्या निवडणुका झाल्या असून, जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ५८ व नव्याने स्थापन झालेल्या १७ अशा जिल्ह्यातील एकूण ७५ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार येत्या ८ फेब्रुवारी ते १ एप्रिल २१ पर्यंत या ७५ ग्रामपंचायतींचा निवडणूक पूर्व तयारीचा कार्यक्रम होणार आहे.

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा प्रत्यक्षात निवडणुका झाल्या आहेत. आता राज्य निवडणूक आयोगाने २२ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक पूर्व तयारीला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे.

तहसीलदार यांच्या वतीने प्रत्येक गावांचे गुगल मॅप नकाशे ८ फेब्रुवारी रोजी अंतिम केले जाणार आहेत. त्यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत संबंधित तलाठी व ग्रामसेवक स्थळ पाहणी करणार असून, त्यानुसार प्रभागाच्या सीमा निश्चिती करणार आहेत. तसेच अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर या प्रारूप प्रभाग रचनेस १६फेब्रुवारीला तहसीलदार यांच्या वतीने मान्यता दिली जाणार आहे. गरज असल्यास २२ फेब्रुवारी २१ पर्यंत यात आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्या दुरुस्त्याना पुन्हा २५ फेब्रुवारीपर्यंत तहसीलदार यांच्या वतीने मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना काढली जाणार आहे. तर ४ मार्च रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत प्रभाग निहाय प्रत्यक्षात आरक्षणे काढली जाणार आहेत. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता याव्यात यासाठी येत्या ५ मार्च २१ रोजी तहसीलदार यांच्यावतीने प्रसिद्धी दिली जाणार आहे. तर येत्या १२ मार्च २१ पर्यंत या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत.

22 मार्च रोजी हरकतींवर होणार सुनावणी
प्राप्त झालेल्या हरकतीं १५ मार्च २१ पर्यंत तहसीलदार यांच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केल्या जाणार आहेत. या सर्व हरकतींवर २२ मार्च २१ पर्यंत उपविभागीय अधिकारी अधिकार्‍यांच्या वतीने सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीनंतर अभिप्राय सह या हरकतींवर अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे .२५ मार्चपर्यंत पाठवला जाणार आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रस्तावांची तपासणी करून येत्या ३० मार्चला जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने या प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यानंतर येत्या १ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या या प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाणार आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंत मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे -खेड ४ , मावळ १, बारामती २, इंदापूर २ , मुळशी १, आंबेगाव १५ जुन्नर ३२, हवेली १

नव्याने स्थापित झालेल्या १७ ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे- इंदापूर २, आंबेगाव २, जुन्नर ४, हवेली २, शिरूर ५, भोर २

सरपंच उपसरपंच निवडी ९ व १० फेब्रुवारीला

१५ जानेवारी रोजी मतदान संपन्न झालेल्या जिल्ह्यातील ७४२ ग्रामपंचायतींचा सरपंच व उपसरपंच निवडी येत्या ९ व १० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहेत. या निवडीसाठी तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना १ फेब्रुवारीच्या आदेशाच्या आधारे दिले आहेत

सरपंच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने गावगाड्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. तसेच गेल्या दहा महिन्यापासून कोरोना मुळे व ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्यामुळे ठप्प झालेल्या विकास कामांना गती मिळण्यास ९ व १० फेब्रुवारी च्या सरपंच निवडी संपन्न झाल्यानंतर तेथून पुढील काळात खऱ्या अर्थाने गती येणार आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.