कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता, MPSC ची परीक्षा झाली पाहिजे – आमदार रोहित पवार

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे MPSCची १४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामध्येच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची परीक्षाही झाली पाहिजे,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०’ची परीक्षा १४ मार्चला होणार होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयोगाने ही पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले. भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

नव्या पेठेतील रस्त्यावर विद्यार्थ्यांना घेऊन पडळकरांनी हे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलक विद्यार्थ्यांना रस्त्यातून हटवण्यास सुरुवात केल्यानंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या अगोदर ५ वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबतीत प्रसिद्धिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. या अगोदर ही परीक्षा मराठा आरक्षण प्रश्नांबाबत महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.