BEST च्या खासगीकरणावरून वाद सुरू असतानाच BMC अग्नीशमनमध्ये कंत्राटी चालक भरणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे बेस्टच्या खासगीकरणावरुन वाद सुरु आहेत. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका आता अग्निशमन दलातील लहान वाहाने आणि रुग्णवाहीका चालविण्यासाठी कंत्राटी चालक भरणार आहे. ५४ कंत्राटी चालक भरण्यासाठी ३ कोटी ९९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे. ही भरती अग्निशमन दलाच्या जिप, रुग्णवाहीका चालविण्यासाठी करण्यात येणार आहे. अग्निशमन दलात चालकांची ६६५ पदं मंजूर आहेत. यातील १५८ पदं रिक्त आहेत. हे कायमस्वरुपी चालक प्रशिक्षीत असून त्यांना पाच वर्षांचा अग्निशमन जवाना पदाचाही अनुभव असतो. अशा चालकांकडून हलकी वाहाने चालवून घेतल्यास बंब तसेच आपत्ती काळात वापरली जाणारी अवजड वाहाने चालविण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे अग्निशमन दलाने हलकी वाहने चालविण्यासाठी कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, या नियुक्तींचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. ही नियुक्ती खासगी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाच्या पुर्णवेळ चालकांना वेतन आयोगानुसार वेतन असते. त्यात त्यांचा ओव्हरटाईम आणि इतर भत्यांमुळे वेतन वाढते. तसेच, त्यांना वैद्यकिय, अपघात सुविधाही पुरवल्या जातात. या सर्व खर्चाला कात्री लावण्यासाठी अग्निशमन दल हे पाऊल उचलत असल्याची शक्यता आहे. मात्र, अग्निशमन दलाचे चालकही आपत्तीच्या ठिकाणी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात, त्यामुळे या कंत्राटी चालकांना कोणत्या सुविधा मिळणार असा प्रश्‍नही आहेच.

गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने कंत्राटी सफाई कामगार नियुक्त केले आहे. यापुर्वी महानगर पालिकेने अनेक कार्यालयात ‘हाऊस किंपींग’च्या नावाखाली कंत्राटी भरती सुरु केली आहे. सध्या बेस्टने कंत्राटी बसेस घेतल्याचा वाद सुरु आहे. महापालिका मुख्यालयातही कंत्राटी ‘हाऊस किपींग’कामगार नियुक्त केले आहेत. त्याबरोबर उपनगरात सुरु होणाऱ्या नव्या वैद्यकिय अभ्यासक्रमासाठीही कंत्राटी वैद्यकिय प्राध्यापक नियुक्त करण्यात येणार असल्याची घोेषणा अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली आहे. तसेच, रुग्णालयातील कारकुनांच्या जागा भरुन काढण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत.