५ मार्चपर्यंत होणार २० हजार शिक्षकांची भरती : विनोद तावडे

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात येत्या ५ मार्चपर्यंत २० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असून, यापुढे भरती प्रक्रिया न थांबता टप्प्याटप्प्याने भरती होत राहणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.
लातूर येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, दरम्यान संस्था चालकांनी भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यास संस्था चालकांची भरती बाजूला ठेवून, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदेतील शिक्षकांची भरती केली जाईल. इतकेच नव्हे तर राज्यात येत्या ५ मार्चपर्यंत २० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे असे आश्वासन त्यांनी दिले. याचबरोबर डीएड, बीएड झाल्यानंतर नोकरी मिळणारच असा समज असणे चुकीचे आहे. डीएड, बीएड आणि टीईटी पास असलेल्यांना आपण शिक्षक झाले आहोत असे वाटते, आणि नोकरी मिळाली नाही की आपण बेरोजगार झालो असा गैरसमज त्यांना होतो. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे, राज्यात येत्या सहा महिन्यात २४ हजार जागा भरल्या जाणार आहेत. अशी घोषणा फेब्रुवारी २०१८ मध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र अजूनही ही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. दरम्यान त्यांनी मार्च महिन्या पर्यंत २० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यांचे हे आश्वासन सत्यात उतरणार की याआधीच्या आश्वासनांसारखे उडून जाणार आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल.