धनंजय मुंडे यांचे पंकजांवरील ‘ते’ आरोप महिला आणि बालविकास विभागाने फेटाळले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- पंकजा मुंडे यांनी 106 कोटी रुपयांचा मोबाईल घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या स्मार्टफोनच्या खरेदीमध्ये घोटाळा केला आहे असा आरोप धनंजय यांनी केला होता. हा आरोप महिला आणि बालविकास विभागाने फेटाळून लावला आहे.

तसेच स्मार्टफोनच्या किंमतीबाबत महिला आणि बालविकास विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. जी किंमत ठरवण्यात आली आहे ती केवळ स्मार्टफोनची नाही तर त्यात स्मार्टफोनसोबत मुलांची पोषणविषयक माहिती अपलोड करण्यासाठी माेबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट साॅफ्टवेअर, 32 जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रुफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी साहित्याचाही समावेश आहे. निविदा प्रक्रियेत मान्य करण्यात आलेली किंमत ही फक्त स्मार्टफोनची नसून ती या सर्व साहित्याची एकत्रित किंमत आहे असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

पोषणासंदर्भातील माहिती जलगतीने उपलब्ध करता यावी या अनुशंगाने राज्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या खरेदीची सर्व प्रक्रिया ही जीईएम पोर्टलवर अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली असून त्यानंतर शासनाची राज्यस्तरीय खरेदी समिती आणि उच्च अधिकार समितीच्या मान्यतेने एल 1 निविदाधारकास स्मार्ट फोन पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती विभागाने दिली.

इतकेच नाही तर, जे अतिरीक्त 5 हजार 100 फोन मागवण्यात आले आहेत त्याबाबत सांगताना, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एकूण स्मार्टफोनच्या 5 टक्के अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) यानुसार 5 हजार 100 एवढे स्मार्टफोन अतिरिक्त घेण्यात आलेले आहेत असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप हे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आलेत असा दावा महिला आणि बालविकास विभागाने केला.

दरम्यान, पॅनासोनिक इलुगा 17 हा स्मार्टफोन खरेदी करताना कंपनीला प्रत्येक मोबाईलमागे सुमारे 2200 रुपये जास्तीची रक्कम देण्यात आली आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पॅनासोनिक इलुगा 17 या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत 6 हजार 499 रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल 6000 ते 6400 रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना 8 हजार 777 रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे 2200 रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे त्यात नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देत, तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली होती.