Pooja Chavan Suicide Case : ‘संजय राठोड यांच्याबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार’ : अनिल देशमुख

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कुणाच्या दबावाचा प्रश्नच येत नाही. संजय राठोडबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्य शासन निर्णय घेणार असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

अनिल देशमुख म्हणाले, यासंदर्भात अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, नियमानुसार चौकशी होणार आहे. विरोधीपक्ष ज्या पद्धतीनं आरोप कररत आहे त्या आरोपात काही तथ्य नाही. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत.

पुढं बोलताना अनिल देशमुख म्हणाले, संजय राठोड कुठं आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मी गृह खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, नियमानुसार चौकशी आणि कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रासमोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आला की, वस्तूस्थिती समोर येईल आणि राज्य शासन निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली होती. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचं नाव घेतलं जात होतं. परंतु भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड याचं नाव घेतल्यानं खळबळ उडाली आहे. पूजा सोशल मीडियावर खूप फेमस होती. त्यामुळं याचे पडसाद तिथंही उमटल्याचं दिसत आहेत. सोशलवर देखील निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. इतकंच नाही तर 8 दिवसांपासून संजय राठोड गायब असल्यानं भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत.