रेखा जरे हत्याकांड : मुख्य आरोपी बाळ बोठे येणार जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन –  अहमदनगर जिल्हा हादरवून सोडणा-या रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांनी दिली. दरम्यान आता यामुळे बोठेपुढील अडचणी वाढल्या आहेत. या वॉरंटमुळे बोठे याला राज्यात व अन्य राज्यात पकडणे शक्य होणार आहे

रेखा जरे यांचा खून झाल्यापासून फरार असलेला मुख्य आरोपी बाळ बोठेचा पोलिसांना अद्यापही ठाव ठिकाणा लागत नाही. त्याला पकडण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंट मिळावे म्हणून पोलिसांतर्फे पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा अर्ज मंजूर करून आरोपीविरूद्ध स्टॅंडिंग वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे.

तपासी अधिकारी अजित पाटील यांनी पारनेर न्यायालयात 1 जानेवारीला हा अर्ज दाखल केला होता. बोठे याच्यावतीने या अर्जाला आव्हान देण्यात आले आहे. त्याच्यावतीने अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी न्यायालयासमोर म्हणणे मांडले. आरोपी फरार नसून अटकपूर्व जामीन अर्जासाठी प्रयत्न करीत आहे, तो आरोपीचा हक्कच आहे, अशी बाजू त्यांनी मांडली. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून फरारी आरोपीविरुद्ध स्टँडिंग वॉरंट काढण्याचा आदेश दिला.

आरोपीच्या वतीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केल्याचे सांगितले जात असले तरी त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे पोलिसांच्या तपास कामाला मदत होणार आहे. आता या आधारे आम्ही पुढील हालचाली सुरू करणार आहोत. पुढील टप्प्यात आणखी काही कायेदशीर प्रक्रियांचा आधार घेतला जाऊ शकतो, असे पाटील यांनी सांगितले.