RIL बनलं जगातील दुसर्‍या क्रमांकाचं सर्वात मोठं ‘ब्रॅन्ड’, आता Apple च्या सर्वोच्च स्थानाला देखील ‘धोका’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक यश मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘फ्यूचरब्रँड इंडेक्स 2020’ मध्ये दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने हे यश अशा वेळी मिळवले आहे जेव्हा कंपनीची मार्केट कॅप 14 लाख कोटींच्या पुढे गेली आहे आणि कंपनी कर्जमुक्त झाली आहे. त्याचबरोबर रिलायन्सचा शेअर भाव देखील 2200 रुपयांच्या पातळीवर आहे.

ही इंडेक्स जगातील मोठ्या ब्रांड्सबद्दल सांगते. आता रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ब्रँड बनला आहे. या इंडेक्समध्ये रिलायन्सच्या पुढे आता आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी अ‍ॅपल आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूकीची गती पाहून आगामी काळात हा जगातील सर्वात मोठा ब्रँड होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

रिलायन्स बद्दल काय सांगितले

2020 ची यादी जाहीर करताना फ्यूचरब्रँडने सांगितले की, सर्वात लांब उडी दुसर्‍या स्थानासाठी घेण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्री सर्वच प्रमाणांत उभी राहिली आहे. ही भारतातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी नैतिकतेने कार्य करते. लोकांचे कंपनीबरोबरचे भावनिक नाते मजबूत आहे.

याचे श्रेय मुकेश अंबानी यांना जाते

फ्यूचरब्रँडच्या अहवालात म्हटले आहे की रिलायन्सच्या यशाचे श्रेय मुकेश अंबानी यांना दिले जावे. त्यांनी कंपनीला एक नवीन ओळख दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, आज कंपनी ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, वस्त्रोद्योग, नैसर्गिक स्त्रोत, किरकोळ आणि दूरसंचार क्षेत्रात कार्यरत आहे.

टॉप 10 मध्ये कोणकोणते ब्रँड?

या इंडेक्समध्ये अ‍ॅपल आणि रिलायन्स नंतर सॅमसंग तिसऱ्या स्थानी, एनवीडिया चौथ्या, मोताई पाचव्या, नाइकी सहाव्या, मायक्रोसॉफ्ट सातव्या, एएसएमएल आठव्या, पेपल नवव्या आणि नेटफ्लिक्स दहाव्या स्थानी आहे. फ्युचरबब्रँड गेल्या सहा वर्षांपासून ही इंडेक्स जाहीर करत आहेत.