Pune News : शुक्रवार पेठेतील १०० वर्षे पुरातन मारुती मंदिराचा जिर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   गुरु हे एक तत्त्व आहे आणि प्रत्येक देवतेमध्ये, प्रत्येक मूर्तीमध्ये हे इश तत्व प्रभावीपणे आपल्याला पहायला मिळते. समर्थ रामदास हे मारुतीचा अवतार होते, हे अनेकांना माहित नसेल. परंतु जगद््गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी समर्थ रामदास हे मारुतीचा अवतार असल्याचे त्यांच्या अभंगात सांगितले आहे, असे मत सज्जनगडाचे समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांनी व्यक्त केले.

श्रीकृष्ण हनुमान व्यायाम मंडळ ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेतील भाऊ महाराज बोळातील १०० वर्षे पुरातन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभंजन मारुती मंदिराची मूर्तीप्रतिष्ठापना आणि कलशारोहण करण्यात आले. मंदिराचा कलशारोहण सोहळा मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते झाला.
यावेळी मंदिराचे अध्यक्ष अण्णा थोरात, उपाध्यक्ष जयंत रणधीर, खजिनदार अमित गुजराथी, मुकेश गुरनानी, नितीन डेंग, सिद्धार्थ रणधीर, रोहित रणधीर, जितेंद्र अंबासंकर उपस्थित होते. धार्मिकविधी आणि प्रतिष्ठापना श्री व सौ. विजय थोरात यांच्या हस्ते झाला. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

अण्णा थोरात म्हणाले, भाऊ महाराज पंडित यांच्या वाड्याच्या कोपºयावरील १०० वर्षे पुरातन मारुती मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम ९ महिन्यापासून सुरु होते. शाहिर गणेश टोकेकर आणि महादू परदेशी या दोन्ही शिल्पकारांनी यासाठी काम केले. १०० वर्षे जुने असलेले हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे हे पुरातन मंदिर टिकून राहण्यासाठी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.