पुणे विद्यापीठाकडून परीक्षेची नियमावली जाहीर, परीक्षेबाबतच्या तक्रारी 48 तासाच्या आत नोंदविण्याची विद्यार्थ्यांना सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने 10 एप्रिलपासून घेण्यात येणा-या प्रथम ते अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विषयात मिऴालेले मार्क 48 तासाच्या आत स्टुडंट प्रोफाइल सिस्टीममध्ये दिले जाणार आहेत. त्यानंतर पुढच्या 48 तासात विद्यार्थ्यांच्या अडचणी, शंका आणि तक्रारी त्याच ठिकाणी नोंदवता येणार आहेत. स्टुडंट प्रोफाइल सिस्टीममध्ये नोंदविलेल्या तक्रारींची शिवाय अन्य कोणत्याही तक्रारी स्वीकारल्या जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा सराव करता यावा याकरिता विद्यापीठाच्या वतीने येत्या 5 ते 9 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मॉक टेस्ट घेतली जाईल. तसेच ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचण आल्यास तेवढाच वेळ संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीत वाढवून मिळणार आहे. परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्याला परीक्षेबाबतची माहिती SMS आणि Email द्वारे दिली जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयनुसार परीक्षेसाठी 20 मिनिटांचा कालावधी जास्तीचा दिला जाईल.

तसेच अभियांत्रिकी 2015 पॅटर्नच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील अनुशेष विद्यार्थ्यांच्या परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर होईल. गणित आणि संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी पद्धतीने 50 गुणांकरिता 30 प्रश्न प्रत्येक 2 गुणांसाठी या पद्धतीने विचारले जातील. विद्यार्थ्यांनी दिलेली 25 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केवळ sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा. याच संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भातील आवश्यक माहिती असेल. तसेच परीक्षेदरम्यान काही अडचण आल्यास 020- 71530202 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन परीक्षा पूर्ण केल्याची पोहोच दिसेल. त्याचा स्क्रीन शॉट, फोटो, प्रिंट जतन करून ठेवावेत असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.