TRP घोटाळा : अर्णब गोस्वामींची पुन्हा कोर्टात धाव, मुंबई पोलिसांवर केले गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीआरपी घोटाळा (TRP Scam) प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक (Editor) अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांनी पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई पोलीसांकडून (Mumbai Police) रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी संपूर्ण तपास आणि कायदेशीर कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी विनंती हायकोर्टाला केली आहे.

वाहिन्यांचे रेटिंग वाढवण्याच्या उद्देशाने काहींनी हंसा रिसर्च ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन घोटाळा केला, असा आरोप आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. एआरजी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचाही घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी विनंती अर्जात केला आहे. एआरजी आऊटलायर ग्रुप आणि स्वत:च्या नावाने आधीच्या प्रलंबित याचिकेत अर्ज दाखल केला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे पश्चिम विभाग वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांचा 26 दिवसांच्या कोठडीत प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला. सिंग यांना पट्ट्याने मारलं तसेच कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांना सातत्याने चौकशीसाठी बोलावून छळवणूक केली, असा गंभीर आरोप या अर्जात केला आहे. तसेच मुंबई पोलीस आमच्या विरोधात कुहेतूने ही चौकशी करत असल्याने ती स्थगिती करावी आणि तपास सीबीआयकडे (CBI) सोपवावा, असंही या अर्जात नमूद केलं आहे.