3 दिवसांपर्यंत उपाशी-तहानलेल्या आवस्थेत 70 फुट खोल विहिरीत तडफडत होता 9 वर्षांचा मुलगा, असा वाचला जीव

फिरोजाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशच्या टुंडला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव चुल्हावलीपासून तीन दिवसांपूर्वी एक 9 वर्षांचा मुलगा गायब झाला होता. कुटुंबियांसह पोलीस मुलाचा शोध घेत सर्वत्र भटकत होते. परंतु, हा मुलगा बनकट गावातील 70 फुट खोल विहिरीत पडलेला सापडला. आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा मुलगा पडल्याचे आढळून आले. हे पाहुन गावकर्‍यांना धक्काच बसला.

गावकर्‍यांनी ताबडतोब ही माहिती टुंडला पोलिसांना दिली आणि अर्ध्या तासाचे रेस्क्यू ऑपरेशन करून मुलाला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. मुलावर जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मुलाच्या डोक्याला आणि पायाला मोठी दुखापत झाली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हा मुलगा तीन दिवसांपर्यंत उपाशी-तहानलेल्या आवस्थेत विहिरीत तडफडत होता. पोलिसांचे म्हणणे आहे की, विहिरीत पडलेला मुलगा रोहित उर्फ बाबू आहे, जो काही दिवसांपूर्वी चुल्हावली गावातून बेपत्ता झाला होता, कुटुंबियांनी तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

टूंडलाचे पोलीस इन्स्पेक्टर रामेंद्र शुक्ला यांच्यानुसार, मुलगा विहिरीत पडला नाही, तर त्यास कुणीतरी विहिरीत फेकले होते, असे प्रथम दर्शनी दिसत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मुलाला शुद्ध आल्यानंतर त्याचा जबाब घेतला जाईल.

एसएसपी अजय कुमार पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 7 फेब्रुवारीपासून मुलगा गायब होता. दरम्यान कंट्रोल रूमला माहिती मिळाली की, बनकटमध्ये विहिरीत मुलाच्या रडण्याचा आवाज येत आहे. तात्काळ पोलीस सक्रिय झाले आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवकुमार यांना विहिरीत रश्शीच्या आधारे उतरवण्यात आले. मोठ्या प्रयत्नाने मुलाला पाठीवर घेऊन सुखरूप बाहेर काढण्यात आले. या पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या धाडसासाठी 11 हजार रुपयांचे बक्षीस एसएससीद्वारे दिले जाईल.