पदोन्नती आरक्षण रद्द ! फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा सामाजिक न्याय बोलण्यासाठी वेगळा अन् कृतीत वेगळा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेतील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना लागू असलेले पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने रद्द केले आहे. मात्र, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात राज्य सरकारची भूमिका अतिशय दुटप्पी आहे, यांचा सामाजिक न्याय हा बोलण्यासाठी वेगळा आहे अन् कृतीमध्ये वेगळा आहे. हे सगळ काही ठरवून करतात, अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यघटनेच्याच साक्षीने घेतली आहे. पण 7 मे रोजी काढलेला जीआर हा बेकायदेशीरपणे काढला असून तो रद्द करावा आणि राज्यातील रिक्त पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. तसेच 2017 पासून पासून आधीच्या सरकारने देखील एकही आरक्षणाची जागा भरलेली नाही. याचा सगळ्या जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून भराव्यात असेही पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून तो कोटा सर्वासाठी खुला करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्याच वेळी या निर्णयाच्या आधारे दिल्या जाणाऱ्या पदोन्नती या याचिकेवरील न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे पदोन्नती मिळालेल्यांना याबाबतची माहिती देण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.