साेलापूर जिल्ह्यातील 1 हजार २८ ग्रामपंचायतींवर सरपंच पदांचे तालुकानिहाय आरक्षण निश्चित

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   जिल्ह्यातील एक हजार २८ ग्रामपंचायतींवर सरपंच पदांचे तालुकानिहाय आरक्षण आज (दि. ८ डिसेंबर) निश्चित करण्यात आले. त्यावेळी कोणत्याही प्रवर्गातील आरक्षण निश्चित करताना पुढील निवडणुकीतील आरक्षण ध्यानात घेऊन आळीपाळीने आरक्षण द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, “यापुढे तालुका पातळीवर गावनिहाय आरक्षण काढले जाईल. १६ डिसेंबरला ११ वाजता तालुक्याच्या मुख्य ठिकाणी याचे आयोजन करावे. आरक्षण काढताना सर्व चिठ्ठ्या समान आकाराच्या असाव्यात. तेव्हा आमदार, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना निमंत्रित करावे. त्याचसोबत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना व सदस्यांनाही निमंत्रित करत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घ्यावी,” असे त्यांनी सांगितलं.

तालुकानिहाय ग्रामपंचायती आणि सरपंच आरक्षण

>> बार्शी : १२९ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला व सहा पुरुषांना संधी मिळणार. त्याचबरोबर अनुसूचित जमातीतील एका महिलेस संधी मिळणार आहे. ३५ ग्रामपंचायतींवर १८ महिला व १७ पुरुषांना सरपंचपदासाठी संधी मिळणार आहे, तर ८२ ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण गटातील ४१ ठिकाणी महिला, तर ४१ पुरुषांना संधी मिळेल.

>> अक्कलकोट : ११७ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतून महिलांना, तर सात पुरुषांना संधी मिळेल. दोन महिला व एका पुरुषास अनुसूचित जमातीतून आणि प्रत्येकी १६ महिला व पुरुषांना मागास प्रवर्गातून सरपंच होत येईल. ३४ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातून १ एका ठिकाणी महिलांना, तर ३३ ठिकाणी पुरुषांना याच प्रवर्गातून सरपंचपद मिळवता येणार आहे.

>> माढा : १०८ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिलांना, तर सात ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीचा पुरुष, १४ ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांना, तर १५ ग्रामपंचायतींवर याच प्रवर्गातील पुरुषांना संधी मिळेल. सर्वसाधारण गटातून प्रत्येकी ३२ महिला व पुरुषांना संधी मिळणार आहे.

>> माळशिरस : १०७ पैकी प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींवर महिला व पुरुषांना समान संधी मिळणार असून, एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील महिलेस, तर १४ महिलांना व १५ पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होता येईल, तर २३ महिलांना व २४ पुरुषांना सर्वसाधारण गटातून सरपंचपदाची संधी मिळणार आहे.

>> करमाळा : १०५ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींवर पाच महिला व सहा अनुसूचित जातीचे आरक्षण पडले आहे, तर एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीच्या महिलेला संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातून २८ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायतींवर महिला, तर १४ ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. ६५ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारणचे आरक्षण असून, त्यात ३३ महिलांचा समावेश आहे.

>> पंढरपूर : ९४ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी दहा ग्रामपंचायतींवर महिला व पुरुषांना संधी मिळणार असून, दोन महिला व एका पुरुषास अनुसूचित जमातीतून सरपंच होता येणार आहे. १२ महिलांना व १३ पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंचपदाची संधी मिळेल, तर प्रत्येकी २३ महिला व पुरुषांना सर्वसाधारण प्रवर्गातून संधी मिळेल.

>> मोहोळ : ९४ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिलांना तर सहा ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील पुरुषाला, १३ महिला व १२ पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंचपद मिळेल. ५५ पैकी २७ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण गटातून महिलांना, तर २८ ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल.

>> दक्षिण सोलापूर : ८३ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला व पुरुषांना तर प्रत्येकी दोन महिला तसेच पुरुषांना अनुसूचित जमातीतून सरपंच होता येणार आहे. ११ ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातून महिलांना, तर १२ पुरुषांना संधी मिळेल. सर्वसाधारण गटातून प्रत्येकी २२ महिला व पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळेल.

>> मंगळवेढा : ७९ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला व पुरुषांना, ११ महिलांना व १० पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून संधी मिळेल, तर प्रत्येकी २४ महिला व २४ पुरुषांना सर्वसाधारण प्रवर्गातून संधी मिळणार आहे.

>> सांगोला : ७६ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला, तर सात ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळेल. एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमातीतील पुरुषाला, ११ ग्रामपंचायतींवर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला, तर १० पुरुषांनाही संधी मिळणार आहे. तर १९ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील महिला, तर २० ग्रामपंचायतींवर पुरुषांना संधी मिळणार आहे.

>> उत्तर सोलापूर : ३६ ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील तीन महिला व तीन पुरुषांना, तर अनुसूचित जमातीतील एका पुरुषाला संधी मिळणार आहे. पाच महिला व पाच पुरुषांना नागरिकांचा मागास प्रवर्गातून सरपंच होण्याची संधी मिळेल, तर १० महिला व ९ पुरुषांना सर्वसाधारण गटातून सरपंचपदाची संधी मिळणार आहे.