‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, संस्थचे अध्यक्ष शरद पवारांनी केली कारवाई

पोलीसनामा ऑनलाईन – नोकर भरती आणि इतर विविध आरोप असलेल्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या दोन पदाधिका-यांचे तडकाफडकी राजीनामे घेत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाई केली आहे. गुरुवारी (दि. 17) झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पवार यांनी तक्रारी दाखल झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या दोन्ही सदस्यांचे राजीनामे घेत ते मंजूर केले.

भाऊसाहेब कराळे आणि डॉ. अरविंद बुरुंगले अशी या राजीनामा घेतलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही संस्थेचे माजी सचिव देखील आहेत. गेल्या काही दिवसात रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर नोकर भरती आणि अन्य गोष्टींवरून विविध प्रकारचे आरोप होत होते. याबाबत संस्थेच्या कर्मचारी आणि मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष पवार यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारींची गंभीर दखल घेत संस्थाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकारी मंडळाचे सदस्य अजित सूर्यवंशी, रवींद्र पवार, राजेंद्र फाळके, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांना पुण्यात बुधवारी बोलावून चौकशी केली होती. यानंतर कराळे आणि डॉ. बुरुंगले यांनाही पुणे येथे बोलावून चौकशी केली. या पार्श्वभूमीवर पवार यांनी तातडीने साताऱ्यात संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक घेत या प्रकरणी कराळे आणि बुरुंगले यांचे राजीनामे घेत ते मंजूर केले आहेत.