राजदमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर ; आमदाराने तेजस्वी यादवला मागितला राजीनामा ; घराणेशाहीवर फोडले पराभवाचे खापर

पटना : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत एकीकडे भाजपला प्रचंड यश मिळत असताना विरोधकांचा मात्र दारुण पराभव झाला आहे. विरोधकांच्या पराभवांमुळे विरोधकांत राजीनाम्याची लाट आली आहे. बिहारमध्ये विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलालाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत राजदच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे नेते तेजस्वी यादव यांना त्यांच्याच एका आमदाराने विधानभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा मागितला आहे.

बिहारमध्ये राजद, काँग्रेस, आरएलएसपी यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती तरीही महाआघाडीला केवळ ४० पैकी एक जागा मिळाली आहे. किशनगंज लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर मोहम्मद जावेद ३४ हजार ४६६ मतांनी निवडून आले आहेत. राजदने २० जागांवर निवडणूक लढविली होती पण राजदचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही. बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यातील राजदच्या महेश्वर प्रसाद यादव या आमदाराने माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा मागितला आहे. महेश्वर प्रसाद यादव हे पाच वेळेस विधानसभेवर निवडून आले आहेत.

घराणेशाहीमुळे पक्षाची दुरावस्था

मुजफ्फरपुर जिल्ह्याच्या गायघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश्वर प्रसाद यादव यांनी सोमवारी पत्रकारांशी सांगितले कि घराणेशाहीमुळे राजदची ही दुर्दशा झाली आहे. राजद पक्ष घराणेशाहीतच अडकून पडला आहे, त्यामुळेच पक्षाची अशी वाईट परिस्थिती झाली आहे. त्यांनी राबडी देवी यांना मुख्यमंत्री केल्यापासून ते तेजस्वी यादव यांना विरोधी पक्ष नेता केल्यापर्यंतचा संदर्भ देत म्हणले की पक्षामध्ये अनेक वरिष्ठ नेते आहेत ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकली असती परंतु एका कुटूंबातील लोकांनाच हि जबाबदारी देण्यात आली. पक्षामध्ये असे अनेक आमदार आहेत ज्यांची कोंडी होतेय, असेही महेश्वर प्रसाद
यादव म्हणाले.