Chakan News : सुरक्षा रक्षकाला गुंगीचे औषध देऊन कंपनीत 66 लाखाचा दरोडा, 7 जणांना अटक

चाकण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुक्यातील वासुली येथील एका कंपनीत आठ जणांच्या टोळक्याने सुरक्षा रक्षकाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून दरोडा टाकून 66 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी या गुन्ह्यातील सात जणांना अटक केली असून त्यांचा एक साथिदार फरार आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना रविवारी (दि.27) पहाटे अडीच ते चारच्या सुमारास वासुली येथील द एस एफ ओ टेन्कॉलॉजीएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली.

नवजीवन यावराव काकड (वय-32 रा.नाणेकर वाडी, चाकण, रामेश्वर चंपत नाईकवार (वय-37 रा. निघोजे), इंद्रा भोलेनाथ पेगो (वय-29 रा. नाणेकरवाडी, चाकण), रघुनाथ श्रीराम काकड (वय-33 रा. खालुंब्रे), राजकुमार विनायक हुकरे (वय-27 रा इंदुरी, ता. मावळ), रोषन खुलसिंग राठोड (वय-20 रा. खराबवाडी, चाकण), दादाराव शिवाजी सावंत (वय-40 रा. इंदुरी) यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा साथिदार बिस्वजित रत्नेश्वर डोले (वय-28 रा. नाणेकरवाडी, चाकण) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.याप्रकरणी नितीन आनंदा सावंत (वय-31 रा. शिरोली ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वासुली येथील द एस एफ ओ टेन्कॉलॉजीएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरी करतात. या कंपनीत संदीप अमोगसिद्ध शिवशरन आणि पुरुषोत्तम फुलेर सिंग हे दोघेजण सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आरोपींनी संदीप आणि पुरुषोत्तम यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. या दोघांना झोप लागल्यानंतर दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करुन 53 लाखाचे 86 केबल रोल, 4 लाख 50 हजारांचे 11 केबल रोल आणि 9 लाखाचा एक केबल रोल असा एकूण 66 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

चार तासांनी सुरक्षा रक्षकांना जाग आली त्यावेळी कंपनीत चोरी झाल्याचे समोर आले. पोलिसांनी सात आरोपींना अटक करुन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींचा एक साथिदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.