‘त्या’ प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची पुन्हा ईडीकडून चौकशी

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे पुन्हा अंमलबजावणी संचलनालयाच्या चौकशीचा ससेमीरा लागला आहे. त्यांना ईडीने यासंदर्भात नोटीस बजावली असून गुरुवारी (दि. ३०) त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र पुन्हा दिल्ली एनसीआर, बिकानेर आणि इतर मालमत्तांप्रकरणी वाड्रा यांची चौकशी करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूकीपुर्वी रॉबर्ट वाड्रा यांची दुबईच्या जुमेराह आणि लंडनच्या ब्रायनस्टोन क्वेअरच्या प्रकरणात बेनामी मालमत्तेसंबंधी चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी तीन दिवस चालली होती. ७ फेब्रुवारी रोजी ईडीकडून ६ तास चौकशी केली होती. या चौकशीत त्यांना ३६ प्रश्न विचारण्यात आले होते.

दरम्यान त्यांच्याकडे याप्रकरणी ईमेल आणि कागदपत्रांची विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची दिल्ली, एनसीआर, बिकानेर येथील जमीनींचे व्यवहार आणि इतर मालमत्ता याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. गुरुवारी चौकशी करण्यात येणार असल्याबाबत वाड्रा यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.