खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींविरोधात RPI चे आंदोलन, मोर्चेकरी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला जातपडताळणी समितीन रद्द केला आहे. जातीच्या बनावट दाखला प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल असतानाही खासदार महास्वामी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याचे म्हणत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांना यापुढे शहरात फिरु देणार नाही, असा इशारा आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

आरपीआयचे नेते प्रमोद गायकवाड यांनी नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून खासदारांच्या निवासस्थानापर्यंत हा मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे म्हणत त्यांचा जातीचा दाखला रद्द केला, असा दावा तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी केला.

खासदार महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर केलेले 12 अर्ज समितीने फेटाळले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी खासदार महास्वामीनी दर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. दरम्यान जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळकागदपत्राबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर केली नसल्याने महास्वामीजींची खासदारकी धोक्यात आली आहे.