1000 रुपयाची लाच घेताना RTO चा खासगी एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   उस्मानाबादच्या आरटीओ कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. टुव्हिलर व फोरव्हिलर लायसन्स काढून देण्यासाठी आरटीओच्या खाजगी एजंटला उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. टुव्हिलर, फोर व्हिलरचे लायसन्स काढून देण्यासाठी आणि ऑनलाईन परीक्षा पास करून देण्यासाठी साडेतीन हजार लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिला हप्ता स्विकारताना एजंटला रंगेहाथ पकडण्यात आले. महंमद उर्फ बाबा हैदरअली शेख (वय- 53 रा. बेंबळी ता. ज़ि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या खासगी एजंटचे नाव आहे.

तक्रारदार यांचे टू व्हिलर आणि फोर व्हिलर यांचे लायसन्स काढून देण्यासाठी आणि ऑनलाईन परीक्षा पास करून देण्यासाठी महंमद उर्फ बाबा हैदरअली शेख याने तक्रारदार यांच्याकडे साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता शेख याने पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ठरलेल्या रक्कमेपैकी एक हजाराचा पहिला हप्ता घेताना शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले. शेख याच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उसमानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके यांनी केली.

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करण्याबाबतचे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते (९५२७९४३१००), पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे (8888813720), अशोक हुलगे (8652433397) यांनी केले आहे.