चालत्या दुचाकीचे हँडेल निघाले, ५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन-कुटुंबासमवेत दुचाकीवरुन घरी जात असताना धावत्या दुचाकीचे हँडेल आणि शॉकअप निघाल्याने टाकीवर बसलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा दगडावर डोके आदळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ममुराबाद गावापासून काही अंतरावर बुधवारी घडली. यज्ञेश जगन धनगर (वय ५) असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील राजू जगन धनगर व आई माधुरी (मुळ रा.चिंचोली, ता.यावल, ह.मु.रायपुर, ता.जळगाव) असे जखमींची नावे आहेत.

राजू धनगर हा तरुण रायपुर येथे वास्तव्याला असून महामार्गावर त्याचे कालिंका माता चौक परिसरात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. बुधवारी पत्नी माधुरी व मुलगा यज्ञेश याच्यासह मुळ गावी चिंचोली येथे दुचाकीने जात असताना ममुराबाद गावापासून पुढे धामणगाव रस्त्यावर अचानकपणे धावत्या दुचाकीचे हॅँडल व शॉकअप निघाले, त्यामुळे पुढे बसलेला यज्ञेश रस्त्याच्याकडेला असलेल्या दगडावर आदळला. कपाळाला जबर जखम झाल्याने तो जागेवरच गतप्राण झाला तर राजू व माधुरी यांच्याही डोक्याला मार लागला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी हा अपघात पाहताच तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सुरक्षा रक्षक व फार्मासिस्ट नसल्याने वादाच्या घटना रात्रपाळीच्या ड्युटीत औषधांचे वाटप करण्यासाठी औषध निर्माता (फार्मासिस्ट) नसल्याने वादाच्या घटना घडतात. जिल्हा रूग्णालयात रात्री येणारा प्रत्येक रुग्ण गंभीर असतो. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक जण असतात. वेळेत उपचार मिळाला नाही तर वाद व मारहाणीच्या घटना घडतात. अशावेळी सुरक्षा रक्षकही नसतात. वारंवार पत्र देऊनही त्याची दखल घेतली नसल्याचे आपत्कालिन कक्षाच्या परिचारिका प्रमुख सुरेखा लष्करे यांनी सांगितले.