‘मोदींचा विकास अन् विखेंच्या रेमडेसिव्हिरचे लाभार्थी दिसत नाहीत’; चाकणकरांचा टोला

मुंबई : नगरचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिल्लीतून रेमडेसिव्हिर आणले आहेत. त्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही त्यांना धारेवर धरले. ‘खासदार विखे यांनी आणलेली दहा हजार ‘रेमडेसिव्हिरची इंजेक्शन’ आणि सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांचा ‘विकास’ यामध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे दोन्हीचे लाभार्थी अजून कुणालाच दिसले नाहीत’, असा टोला लगावला.

सुजय विखे-पाटील यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिल्लीतून नगरमध्ये आणल्याचे समजल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता चाकणकर यांनी ट्विट करून म्हटले, की ‘खा.सुजय विखे डॉक्टर आहेत, डॉक्टरांना जीवाचे मोल असते. मानवतेच्या भावनेतून सुजय विखेंनी कोठे लस मिळते ते सांगावे. याचा फायदा सर्वांनाच होईल. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातच आहे. आमच्याकडेही लोक इंजेक्शनबद्दल विचारतात. तुम्ही आम्हालाही रेमडेसिव्हिर कसं आणायचं हे सांगाल ही अपेक्षा आहे’.

तसेच त्यांनी पुढे म्हटले, की ‘खा. सुजय विखे यांनी आणलेली दहा हजार ‘रेमडेसिव्हिरची इंजेक्शन’ आणि सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांचा ‘विकास’ यामध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे दोन्हीचे लाभार्थी अजून कुणालाच दिसले नाहीत. तब्बल दहा हजार इंजेक्शनच्या बाबतीत संशय निर्माण झाल्याने या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी व सत्य समोर यावे हीच आमची भूमिका आहे.’,