Hasan Mushrif : ‘माझी कळ काढू नका, मी जर तुमची प्रकरणं काढली तर…’ 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात सातत्याने वाक् युद्ध पाहिला मिळत आहे. त्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यावर निशाणा साधला.’धनंजय महाडिक माझी कळ काढू नका. मी जर तुमची प्रकरणं काढायला लागलो तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही’, असे ते म्हणाले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक होत आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, धनंजय महाडिक माझी कळ काढू नका. मी जर तुमची प्रकरणं काढायला लागलो तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. वासाचं दूध, दुधाचे टँकर, नोकर भरतीतील भ्रष्टाचार ही प्रकरणे मी बाहेर काढली तर महाडिकांना जड जाईल. तसेच पालकमंत्री सतेज पाटील हे डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना सक्षमरीत्या चालवत आहेत. मी माझा संताजी घोरपडे कारखाना व्यवस्थित चालवत आहे. तुम्ही तुमच्या भीमा कारखान्याकडे लक्ष द्या अन्यथा पळता भुई थोडी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी अशाप्रकारे टीका करतानाच उणी धुनी न काढता गोकुळचा प्रचार करा, असे आवाहनही केले. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीसाठी 2 मे रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.