वर्णभेदी टीकेमुळे पाक कर्णधार गोत्यात

डरबन : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमद दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू अँडिल फेहलुकवायो याला उद्देशून वर्णभेदी टिप्पणी केल्यामुळे गोत्यात आला आहे. डरबन येथे मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सरफराजने फेहलुकवायोचा ‘काळा’ असा उल्लेख केला. सरफराजच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट जगतात त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

सामन्यात ३७ व्या षटकादरम्यान फेहलुकवायो फलंदाजी करत होता. यावेळी सरफराजने एक वाक्य उच्चारले. यात त्याने वंशभेद व्यक्त होईल असे शब्द वापरले. सामना अधिकाऱ्यांनी या वाक्याची दखल घेतली नाही. परंतु, सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सरफराज याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही होऊ लागली आहे.