सचिनने आणखी एक मित्र गमावला, संघातील माजी सहकारी विजय शिर्के यांचे ‘कोरोना’मुळे निधन

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कोरोनामुुळे त्याचा आणखी एक मित्र गमावला आहे. एकेकाळी सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत भारतीय संघाकडून खेळलेले विजय शिर्के (Vijay Shirke) (वय 57) यांचे कोरोनामुळे ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले आहे. शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात सचिनचे जवळचे मित्र अवी कदम यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

 

 

 

 

 

 

 

 

काही वर्षांपूर्वीच विजय शिर्के ठाण्याला राहायला गेले होते. कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यावर त्यांनी मात केली होती. पण इतर व्याधी बळावल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे शिर्के यांच्या एका मित्राने सांगितले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 17 वर्षाखालील क्रिकेट समर कॅम्पचे विजय शिर्के दोन वर्ष प्रशिक्षकपदी होते. भारतीय संघाचे माजी गोलंदाज आणि सध्याचे निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांनीही विजय शिर्के यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.