सचिन तेंडुलकरच्या प्रकृतीबाबत बालपणीच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, म्हणाला..

पोलीसनामा ऑनलाइन टीम : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी (दि. 2) रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती ट्विट करून दिली. तेव्हापासून सचिनचे चाहते त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम, शाहिद आफ्रिदी यांनीही तेंडुलकरला लवकर बरा हो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सचिनचा बालपणीचा मित्र अतुल रानडे यांने सचिनच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

रानडे यांनी सांगितले की, चाहत्यांनी चिंता करण्याची कारण नाही. हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळतील म्हणून तो तेथे दाखल झाला आहे. त्यात कोरोनाची लक्षणे दिसत होती आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे होते. तिथे मशीन्स व अन्य सर्व साहित्य उपलब्ध आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून तो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाल्याचे म्हटले आहे. सचिनने ट्विटमध्ये म्हटले होते की, तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेचे आभार. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. काही दिवसांतच घरी पुन्हा येईल, अशी आशा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा.

वर्ल्ड कप विजयाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व भारतीय व संघातील सहकाऱ्यांना शुभेच्छा असे म्हटले आहे. या ट्विटनंतर त्याची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असे मॅसेज येत आहेत. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यानंही ट्विट करून सचिनच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी तू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा मोठ्या धैर्याने सामना केला आहे. मला खात्री आहे की तू कोरोनालाही सीमापार टोलावशील. लवकर बरा हो मास्टर. 2011 च्या वर्ल्ड कप विजयाच्या 10 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सच्या स्टाफसोबत केल्यास आनंद होईल. त्याचे फोटो पाठवायला विसरू नकोस, असे अक्रम यांनी म्हटले आहे.