सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून कायमची ‘हकालपट्टी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तळोजा कारागृहात अटकेत असलेल्या मंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझेला अखेर मंबई पोलीस दलातून बडतर्फ केल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी (दि. 11) यांनी दिली आहे. संबंधित प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला 31 मार्च रोजी अटक केली होती. पोलीस आयुक्तांनी भारतीय राज्यघटनेच्या तरतुद 311(2) (ब) अन्वये आदेश जारी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने सचिन वाझेला अटक केल्यानंतर सेवेतून हकालपट्टीच्या प्रक्रियेला मुंबई पोलिसांकडून वेग आला होता. मात्र शेवटची पोस्टिंग विशेष शाखेत झाली होती, त्यामुळे ही प्रक्रिया संबंधित विभागाची जबाबदारी असल्याची पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी एटीएस आणि एनआयएला पत्र लिहून वाझेंच्या या प्रकरणातील समावेशासंबंधित कागदपत्रांची मागणी केली होती.

ज्यात एफआयआर कॉपीचाही उल्लेख होता. हे कागदपत्र सोमवारीच विशेष शाखेला सोपवले होते. त्यानंतर विशेष शाखेचे अधिकारी यावर आपला अहवाल बनवून राज्य सरकारला सोपवतील अन् वाझेंवर कारवाईची मागणी करतील, अशी चर्चा होती. मात्र अखेर आता वाझेला पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान ताडदेव सशस्त्र पोलीस दलात नेमणूक केलेल्या काझीचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्याला अटक केली होती. त्यामुळे त्याला देखील पोलीस सेवेतून निलंबित केल्याची माहिती सशस्त्र पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्र यांनी दिली होती. त्यानंतर कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्षात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी सुनील मानेला देखील एनआयने बेड्या ठोकल्या आहेत.