…म्हणून अरबाजने सलमान खानचे ‘तोडले’ दात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सलमान खान हे नाव मोठे आहे. शिवाय त्याच्या रागाशी सर्व परिचित आहेत. त्याच्या रागामुळे त्याच्या कोणी वाटे जात नाही. त्यामुळे सलमानचे कोणी दात तोडले यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतू हे सत्य आहे. सलमानचा भाऊ अरबाजमुळे सलमानचे दात तुटल्याचा खुलासा खुद्द सलमानने केला आहे. तो भारत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोवर गेला होता. त्यावेळी त्याने ही माहिती दिली.

सलमान खान आणि त्याच्या भावांमधील बाँडिंग खूप चांगले आहे. चांगल्या- वाईट काळात हे नेहमी एकत्र असतात. त्यांच्या नात्यासह त्यांचे किस्सेही तसेच मजेशीर असतात. त्यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कतरिना आणि सलमाननं त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सलमाननं यावेळी त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगताना भाऊ अरबाजमुळे त्याचे दोन दात कसे तुटले होते याचा एक किस्सा सांगितला.

आम्ही त्यावेळी माझ्या मावशीच्या घरी गेलो होतो. तिथे घसरगुंडी होती. ज्यावर एका बाजूनं वर चढायचं आणि दुसऱ्या बाजूने खाली घसरायचं. मी त्यावेळी वरच्या बाजूला आणि अरबाज त्याच्या खालच्या बाजूला होता. मला अरबाजला वर येण्यापासून थांबवायचं होतं आणि तो मला खाली घसरण्यापासून थांबवत होता. बरावेळ आमचा खेळ असाच सुरू होता पण शेवटी अरबाज वैतागला आणि त्यानं मला खाली खेचलं आणि तिथून बाजूला झाला. पण मी जोरात खाली आल्यानं तोंडवर पडलो आणि माझे पुढचे दोन दात तुटले, असा किस्सा सलमानने यावेळी सांगितला.

तेव्हा दात तुटल्याने तसंच फिरायला मला लाज वाटायची, म्हणून मी नकली दात लावून सर्वत्र फिरायचो, असं त्याने यावेळी सांगितलं. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, सलमान सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वत्र दिसत आहे. भारत येत्या ५ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.