पुरंदर : मालकाच्या रक्षणासाठी कुत्र्यांचा चक्क बिबटयावर हल्ला

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन – बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या आपल्या मालकाचा जीव वाचविण्यासाठी दोन कुत्र्यांनी थेट बिबट्यावर हल्ला करून मालकाला जीवदान दिले. मात्र झटापटीत मालकासह दोन्ही कुत्रे जखमी झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील मांढर गावानजीकच्या शिंदेवाडीत घडली.

विश्वास शंकर पापळ (रा. शिंदेवाडी) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतक-याचे नाव आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, विश्वास पापळ हे शेतातील गुरांना पाणी पाजण्यासाठी निघाले होते. त्यावेळी झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर उडी मारली. यावेळी त्यांनी त्याच्या हल्ला परतविण्यासाठी त्याच्याशी झटापट करत आरडाओरड सुरु केली. त्यावेळी त्यांच्या शेतातील दोन्ही कुत्रे त्यांच्या मदतीसाठी धावून आले अन् बिबट्यावर हल्ला चढविला. दोन्ही कुत्र्यांनी एकदमच हल्ला केल्यामुळे काही वेळातच बिबट्याने दोन्ही बहाद्दर कुत्र्यासमोर अक्षरश: शेपूट घालून पळ काढले. त्यामुळे विश्वास यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या झटापटीत विश्वास यांच्यासह त्यांचे दोन्ही कुत्रे जखमी झाले. विश्वास यांना ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिली. शिवतारे यांनी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तावरे यांना तत्काळ सूचना देत पुढील उपचार करण्याच्या सूचना दिल्या.