RSSच्या ‘सैनिकी शाळे’त मॉब लिंचिंग शिकवण्यात येईल : समाजवादी पक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश राज्यातील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सैनिकी शाळा सुरु करणार आहे. यावर समाजवादी पक्षाने जोरदार टीका केली आहे. RSS च्या या शाळेत मॉबलिंचिंग आणि संप्रदायिकता शिकवली जाईल अशी टीका सपाने केली आहे. राज्यामध्ये वेगळी लष्करी शाळा उघडण्याची काय गरज आहे. यामुळे संघाच्या हेतूवर संशय निर्माण होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय स्तरावर षडयंत्र रचत आहे, हा संविधानाचा अपमान आहे असे मत सपाने व्यक्त केले आहे.

समाजवादी पक्षाने म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फुटीरतावादी विचारधारेचे अनुसरण करत आहे. स्वातंत्र्यलढ्यात यांची भूमिका नकारात्मक होती. यांचे स्वातंत्र्यलढ्यात काही योगदान नाही. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी संघ अशा शाळा निर्माण करत आहेत. या शाळेमध्ये माॅबलिंचिंग शिकवण्यात येईल.

काय आहे सैनिकी शाळा ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढील वर्षापासून संघाची पहिली सैनिकी शाळा सुरू करणार आहे. या शाळेत भारतीय सैन्यात अधिकारी पदावर रूजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर, या शाळेच्या संचालनाची जबाबदारी संघाच्या विद्या भारतीकडे असणार आहे. या शाळेचे नाव माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह यांच्या नावावरून ‘रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर’ असे असणार आहे. रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिरची पहिला शाखा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथे सुरू केली जाणार आहे. या ठिकाणी १९२२ मध्ये संघाचे माजी सरसंघचालक रज्जू भैय्या यांचा जन्म झाला होता.

आरोग्यविषयक वृत्त