परराज्यातून आयात होणाऱ्या वाळूला आता लागणार 10 % रॉयल्टी

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – परराज्यातून जिल्ह्यात वाळू विक्री सर्रासपणे केली जाते. मात्र, आता ही वाळू जिल्ह्यात आणण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे 10 टक्के स्वामित्व धन (रॉयल्टी) भरणे आवश्यक आहे. ही रॉयल्टी भरल्यानंतरच संबंधितांना झिरो पास दिला जाणार आहे. यातून प्रशासनाच्या महसूलात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे परराज्यांतून मोठ्या प्रमाणात वाळू विक्रीसाठी आणली जात आहे. मात्र, कन्हान, गुजरातच्या वाळूला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. त्यामुळेच अनेकजण वाळू आणून त्याचा साठा करून ठेवत आहे. तसेच जेव्हा गरज भासेल तेव्हा या वाळूची विक्री केली जाते. मात्र, वाळूसंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळेच परराज्यांतून वाळूचा किती साठा येतो आणि ही वाळू परवाना घेऊन आली आहे की बेकायदेशीर? याबाबतची माहिती उपलब्ध होत नव्हती.

दरम्यान, गेल्या एक वर्षापासून गुजरात, कन्हान या भागातील वाळू विक्री जिल्ह्यात केली जात आहे. 6-7 ब्रासचा एक ट्रक याप्रमाणे ही वाळू जिल्ह्यात आणली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वाळूचा साठा करून विक्री केली जात आहे.

जिल्ह्यासह परराज्यांतील वाळू विक्री
जिल्ह्यासह इतर राज्यांतील वाळू मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. त्यानुसारच आता सरकारने 10 टक्के प्रतिब्रास याप्रमाणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच झिरो रॉयल्टी पासशिवाय वाहतूक केल्याचे आढळल्यास दंडात्माक कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.