उमरखेडच्या नायब तहसीलदारांवर वाळू तस्कराकडून चाकू हल्ला

यवतमाळ : उमरखेड (Umarkhed) तालुक्याचे नायब तहसीलदार वैभव पवार (वय ३८) यांच्यावर वाळू तस्काराने चाकू हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. उमरेखड (Umarkhed)  -ढाणकी रस्त्यावरील गोपिकाबाई गावंडे विद्यालयाजवळ शनिवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली.

नायब तहसीलदार वैभव पवार हे रात्री रस्त्यावर वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एकाने त्यांच्या जवळ जात अचानक चाकू काढून त्यांच्या पोटात खुपसला. काही कळायच्या आत आरोपी तेथून पळून गेला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली. वैभव पवार यांना प्रथम उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.